Mysteries of the Mountain in Marathi : पर्वताचे रहस्य गोष्ट

By AllinFocus

Published on:

Mysteries of the Mountain in Marathi : पर्वताचे रहस्य गोष्ट

एक शेतकरी होता. त्याला दोन मुलगे होते. मोठा मुलगा खोटारडा आणि बेइमान होता. धाकटा मुलगा प्रामाणिक आणि इमानदार होता. मोठ्या मुलाचे लग्न झाले होते. परंतु धाकट्या मुलाचे मात्र लग्न झाले नव्हते.

एकदा शेतकरी आजारी पडला आणि त्या आजारपणातच तो काही दिवसांनी मरण पावला. धाकट्या मुलाला वडलांच्या मृत्यूमुळे फार दुःख झाले. त्याने घर सोडले व तो रानावनात वेड्यासारखा भटकू लागला. मोठ्या मुलाला मात्र वडलांच्या मरणाचे जराही दुःख झाले नाही. त्याचा दिनक्रम नेहमीप्रमाणे आनंदात चालला होता.

रानावनात भटकणाऱ्या धाकट्या मुलाला गावातल्या चार-पाच मोठ्या माणसांनी समजावले आणि त्याला घरी परत आणले. धाकटा मुलगा घरी आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, वडलांच्या सर्व मौल्यवान वस्तू घरातून गायब झाल्या आहेत. जेव्हा तो दुःखामध्ये रानावनात भटकत होता, तेव्हा मोठ्या मुलाने व त्याच्या बायकोने सर्व मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या.

धाकट्या भावाने मोठ्या भावाला विचारले, “दादा, वडलांच्या मौल्यवान वस्तू कोठे आहेत?” मोठा भाऊ म्हणाला, “वडलांनी या घराशिवाय दुसरी कोणतीही संपत्ती मागे ठेवलेली नाही. मला बायको-मुले आहेत आणि तुझं तर अदयाप लग्न झालेलं नाही. त्यामुळे या घरावर फक्त माझाच अधिकार आहे.”

also read : Top 5 News 29 July in Marathi

धाकट्या भावाने या गोष्टीला अजिबात विरोध केला नाही. तो शांतपणे घर सोडून निघून गेला. तो आपल्या गावापासून चालत चालत दूर एका पर्वताच्या पायथ्याशी पोचला. तेथे त्याने एक छोटीशी झोपडी बांधली. तेथे एक कुत्रा आणि एक मांजर त्याचे मित्र बनले. आता पावसाळा सुरू होणार होता. त्याने पायथ्याच्या आसपासची जमीन नांगरून शेती करण्याचा निश्चय केला.

त्याच्याजवळ बैल नव्हते. त्याने लाकडाचा एक छोटासा नांगर तयार केला. मग कुत्र्याला आणि मांजराला नांगराला जुंपले. पण कुत्रा आणि मांजर नांगर कसा ओढणार ? पर्वताने हे दृश्य पाहिले. पर्वताला त्याची दया आली आणि तो हसू लागला. पर्वताला मोठ्याने हसताना ऐकून मुलाने त्याच्याकडे पाहिले. मुलाला पर्वताच्या तोंडात हिरे, माणके आणि मोहरा चमकताना दिसल्या. त्याने एक पिशवी घेऊन पर्वताच्या तोंडात उडी मारली. मग त्याने पिशवीमध्ये हिरे, माणके आणि मोहरा भरल्या आणि तो पर्वताच्या तोंडातून बाहेर आला.

हिरे, माणके आणि मोहरांनी भरलेली पिशवी घेऊन तो आपल्या गावी परत आला. त्याने त्या गावात एक सुंदर बंगला बांधला. शेतीसाठी जमीन खरेदी केली. त्याने कामासाठी नोकरचाकर ठेवले आणि तो शेती करू लागला. त्याचे लग्नही झाले. आता त्याची गणती श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागली.

धाकट्या भावाची सुखसमृद्धी पाहून मोठ्या भावाला आश्चर्य वाटले. एके दिवशी तो धाकट्या भावाच्या घरी गेला. धाकट्या भावाने मोठ्या भावाचे आनंदाने स्वागत केले. त्याला प्रेमाने बसवून खाऊ-पिऊ घातले. गप्पा मारता मारता मोठ्या भावाने विचारले, “ही एवढी सारी संपत्ती तुझ्याकडे कशी आली ?” धाकट्या भावाने मोठ्या भावाला सारी खरी खरी हकीकत सांगितली.

मोठ्या भावालासुद्धा त्याच्यासारखे श्रीमंत होण्याची इच्छा झाली. तो गाव सोडून पर्वताच्या पायथ्याशी राहू लागला. त्यानेसुद्धा एक कुत्रा आणि मांजर पाळले. पावसाळा आला. मोठ्या भावाने लाकडाचा छोटासा नांगर बनवला. मांजर आणि कुत्र्याला नांगराला जुंपले. कुत्रा आणि मांजर नांगर कसा ओढणार ? पर्वताने हे दृश्य पाहिले. पर्वताला दया आली आणि तो हसू लागला. पर्वताच्या हसण्याचा आवाज ऐकून मोठ्या भावाने पर्वताच्या तोंडाकडे पाहिले. मोठ्या भावाला पर्वताच्या तोंडात हिरे, माणके आणि मोहरा दिसल्या. त्याने लगेच पर्वताच्या तोंडात उडी मारली.

तो भराभर मोहरा आणि हिरे, माणके पोत्यांत भरू लागला. पर्वताने त्याचाmलोभी स्वभाव ओळखला. त्याने रागारागाने आपले दोन्ही ओठ बंद केले. पर्वताचे तोंड बंद झाले. मोठा भाऊ कायमचाच पर्वताच्या तोंडात गडप झाला.

त्याला त्याच्या अप्रामाणिकपणाची शिक्षा मिळाली.

Leave a Comment