Bulbul Comes Home… in Marathi: बुलबुल घरी येतो… गोष्ट.

By AllinFocus

Published on:

Bulbul Comes Home… in Marathi: बुलबुल घरी येतो… गोष्ट.

पुण्याजवळच्या पिंपरीच्या आमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर झाडं होती. जंगलातच राहतोय असं वाटायचं मला. घराच्या पलीकडे तीनही बाजूंना संरक्षित जंगल होतं. त्यात दोन मोठी तळी होती. त्यामुळे तिथे भरपूर पक्षी होते. त्या तळ्यांच्या काठाने स्टॉर्कची मोठी कॉलनी होती. मोरांचे आवाज तर नेहमीचेच. अनेक प्रकारची मुंगसं, सिव्हेट, सापही अधूनमधून दिसायचे.

पुढे आम्ही दापोलीला राहायला गेलो. तिथेही भरपूर पक्षी होतेच. मग काय, मला सतत दुर्बीण घेऊन पक्ष्यांचं निरीक्षण करत बसण्याचा छंदच लागला. पक्ष्यांच्या हालचालींवर नीट लक्ष ठेवलं तर पक्ष्यांच्या लकबी, सवयी, ते रोज काय काय आणि कसं कसं करतात हे कळू शकतं. रोज ठरलेल्या वेळी ते ठराविक ठिकाणी येतात, आपल्या ठरलेल्या भागातून इतर पक्ष्यांना हुसकावून लावतात, जोडी जमवताना एकमेकांच्या मागे छान लयदारपणे उडतात, घरटं बांधण्याची त्यांची किती लगबग असते – अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतात. जाळीदार झुडपांतली, झाडापानांतली त्यांची घरटी गुपचूप शोधताना खूप मजा यायची. मग मी दुर्बीण घेऊन तासन्तास त्या घरट्यांकडे, पक्ष्यांकडे बघत बसायचे.

गेल्या वर्षीची गोष्ट. पावसाळा संपत आला होता. एक दिवस घराबाहेरच्या पामच्या झाडावर मला एक बुलबुल पक्ष्याचं घरटं दिसलं. त्या झाडाच्या फांद्या तशा सरसरून वाढल्या होत्या. हे घरटं सुकलेल्या झावळ्या आणि नव्या झावळ्या यांत बेमालूमपणे लपलेलं होतं; तरी ते आम्हाला दिसलंच. आम्ही हळूच लांबून त्या घरट्याचे फोटो काढून ठेवले. ही काही खास सिक्रेट अशी जागा वाटत नव्हती. जमिनीपासून जेमतेम सात-आठ फुटांवरच होतं ते घरटं. मला जरा काळजीच वाटायला लागली. कारण कावळे अशा जागा शोधून घरट्यातून हमखास पिल्लं उचलतात. इतक्यात पुढच्या दोन-तीन दिवसांत आमच्या माळीबुवांनी नेमक्या तिथल्या सुकलेल्या फांद्या साफ करून टाकल्या आणि ते घरटं अगदी समोर दिसू लागलं. मी माळीदादांना थोडी रागावलेच. आणि एक दिवस माझी भीती अक्षरशः खरी ठरली.

सकाळी सातची वेळ असावी. आम्ही चहा पीत होतो. दारातून समोरच ते पामचं झाड दिसत होतं. तेवढ्यात कावळ्यांचा आणि बुलबुलाचा झटापटीचा आबाज आला. अगदी काही सेकंदच. मग त्या घरट्यातून काही तरी खाली पडताना दिसलं. कावळे अजूनही तिथेच घिरट्या घालत होते. आम्ही जाऊन त्या कावळ्यांना हाकलेपर्यंत त्यांनी घरट्यातून पिलं पळवली होतीच… त्या बुलबुलाला काय करावं हे कळत नव्हतं. त्याने घरट्याच्या आजूबाजूला नुसत्या घिरट्या घातल्या. काही वेळ तो तिथेच घोटाळत राहिला. तीनही पिलं घरट्यातून काही सेकंदांच्या आत कब झाली होती. पक्षी-प्राण्यांना हे काही नवीन तं. एकजण दुसऱ्याचे भक्ष्य असतातच, असं आपण कतीही वाचलेलं असलं तरी असं काही बघून वाईट वाटतच.

सकाळची कामं उरकून मी तासाभराने परत त्या झाडाजवळ गेले. ते रिकामं घरटं बघून मलाच वाईट वाटल. त्या क्षणी मला आठवलं की घरट्यातून काही तरी पडताना आपण पाहिलं होतं. त्या झाडाची मुळं जमिनीतून वाढून वर आली होती. तिथे मी जरा शोधलं, तर खरंच एक मऊसूत, नुकतेच पंख फुटू लागलेला इवलासा गोळा भेदरल्यासारखा पडला होता. ते पिलू जमिनीवरच्या मातीत आणि त्या मुळांच्या गर्दीत इतकं बेमालूम मिसळून गेलं होतं की त्या कावळ्याला ते दिसलं नसावं.

त्याला उचलावं का? घरात घेऊन जावं का? पण आपण त्याला पक्षी म्हणून कसं वाढवणार? ते जगेल का तरी तसं ? पण त्याला तिथेच असं मरायला तरी कसं सोडायचं ? .. काय करावं, आधी काही कळेना. शेवटी मी ते पिल्लू उचलून घरी आणलं. माझ्या तळहाताहूनही ते लहान होतं. पक्ष्याचं इतकं छोट पिल्लू मी पहिल्यांदाच हातात घेतलं होतं. ते पिल्लू अजूनही भीतीने थरथरत होतं. त्याच्या हृदयाचे ठोके माझ्या हाताला जाणवत होते. आम्ही ड्रॉपरने त्याच्या इवल्याशा चोचीतून पाणी भरवल्यावर जरा त्याला हुशारी आली. सुरुवातीला एका छोट्याशा बॉक्समध्ये त्याला ठेवलं होतं. त्या पिलाचे डोळेसुद्धा अजून नीटसे उघडले नव्हते, किंवा खोलीतल्या ट्युबलाइटचा प्रकाशाचा त्याला त्रास होत असावा. तरी पाणी प्यायल्यावर त्याच्या अंगात जरासं बळ आलं होतं. त्याने आपले इवलेसे पंख कसे तरी फडफडवत हलवले आणि बॉक्सच्या कडेकडेने त्याने बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. त्या एवढ्याशा घरट्यात अशी तीन पिलं आणि त्यांची आई कसे काय मावले असतील कोण जाणे!

नगरपालिकेच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन करून बुलबुलाच्या पिल्लाची सुटका केल्याचं कळवलं. थोडे दिवस त्याला सांभाळा, मग बघू काय करायचं, असं म्हणून हसत डॉक्टरांनी फोन ठेवून दिला. शक्यतो हातात ग्लोव्ज घालून त्याला हाताळायचं, काय खायला-प्यायला द्यायचं हेसुद्धा सांगितलं.

आम्ही त्याला बॉक्ससकट बेडरूममध्ये आणलं. मला भीती होती, की रात्री उड्या मारून मारून हे बॉक्सच्या बाहेर येईल की काय ! म्हणून जरा मोठासा बॉक्स घेऊन त्याला त्यात ठेवलं. रात्री अंधार झाल्यावर बॉक्स हलकासा बंद केला. दहा-पंधरा मिनिटं आतल्या आत हलकासा उड्या मारण्याचा आवाज येत राहिला आणि मग एका कडेला जाऊन ते पिलू शांत झोपून गेलं.

सकाळी सहाच्या सुमारास परत त्या बॉक्समध्ये उड्या मारण्याचा खुडखुड आवाज यायला लागला, तसं न राहवून मी त्याला बाहेर काढलं. त्याला मांडीवर ठेवलं, तर तुडतुड पावलांनी धडपडत उड्या मारत ते मांडीवर खेळू लागलं. कदाचित त्याला हळूहळू या वातावरणाची सवय होईल असं वाटायला लागलं. एकदा ते मोठं झालं की त्याला सोडून देता आलं असतं; पण घरातल्या वातावरणाची सवय झाल्यावर बाहेर ते जगेल याचीही खात्री वाटत नव्हती. अशा पक्ष्यांना मोठे पक्षी हमखास पकडतात असंही ऐकलं होतं. बुलबुल ही अजूनही जंगलातल्या पक्ष्यांची प्रजाती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बुलबुलाच्या पिलाला घरी ठेवलेलं कायद्यालाही चाललं नसतं. पण आम्ही तरी दुसरं काय करणार होतो? शेवटी ठरवलं, हे पिल्लू मोठं होईपर्यंत त्याला नीट सांभाळायचं; मग पुढचं पुढे.

माझ्या मुलीने तिचं नाव ठेवलं ‘ब्राउनी’. ती मादी होती का नर हेही आम्हाला कळलं नाही, कारण नर- मादी बुलबुल तसे अगदी सारखे दिसतात. पण आमच्या दृष्टीने ब्राउनी ‘ती’ होती. तिच्यासोबत पुढचे सहा-आठ महिने आम्ही खूप धमाल केली. ऑम्लेटचे अळ्यांसारखे बारके लांब तुकडे करून टूथपिकने त्याला चोचीतून भरवणं; खिमा, मऊ फळांचा गर काढून तो भरवणं; छोट्या चमच्याच्या कडेकडेने पाणी भरवणं, असे अनेक प्रयोग आम्ही सुरू केले. नंतरचे काही दिवस लहान बाळासारखं त्या पिलाचं भूक आणि शी-शूचं चक्र चालू असायचं.

also read : And the Horse Became a Man.. in Marathi

मोठ्या खोक्यातून पंख फडफडवत ब्राउनी उड्या मारायला लागली तेव्हा आम्ही तिच्यासाठी एक पिंजरा आणला. दिवसातून पाच-सहा वेळा अन्न भरवण्यासाठी आम्ही तिला पिंजऱ्याच्या बाहेर काढायचो. सुरुवातीला पंखांची पूर्ण वाढ झाली नसल्यामुळे जमिनीवर खाली ठेवलेल्या सामानावर ती उड्या मारायची, धडपडायची. दिवसभर तिचा पिंजरा स्वयंपाकघरात ठेवलेला असे. आमच्या घरातल्या काम करणाऱ्या मावशी, काका आणि आम्ही येता-जाता सगळे तिकडे डोकावून जात असू. हळूहळू तिला पंख यायला लागले. हळूच उडून दोन- चार फुटांवरून गिरकी घेऊन पुन्हा जमिनीवर बसायला ती शिकली. येता-जाता तिला पिंजऱ्याच्या बाहेर काढून अंगाखांद्यावर खेळवताना जाम मजा यायची. ओढणीला बिलगून बसायला, मानेशी चिकटून बसायला तिलाही फार आवडायचं. एव्हाना मला आणि माझ्या मुलीला ती छान ओळखायला लागली होती. माझ्या मुलीला तर एक खेळणं मिळाल्यासारखं झालं होतं. रोज रात्री या पिंजऱ्याचा मुक्काम मुलीच्या बेडशेजारी असायचा.

तिला हाताने भरवण्याचं काम महिन्याभरापर्यंत चाललं असेल. नंतर ती स्वतःचं स्वतः खायला शिकली. सीताफळ, पेरू, पपई तिच्या जाम आवडीच्या गोष्टी. पिंजऱ्याच्या बाहेर काढल्यावर ती खोलीत मनमुराद फिरायची. आम्ही जेवायला बसलो असलो तर डायरेक्ट आमच्या ताटातच उतरायची. त्यामुळे तिच्यासमोर खाणं-जेवणं अशक्य होतं. सुरुवातीला खोलीत बाहेर सोडल्यावर हाताने धरून आम्ही तिला अलगद पिंजऱ्यात ठेवून द्यायचो. किंवा त्या पिंजऱ्याचीच तिला इतकी सवय झाली होती की ती आपसूक थोड्या वेळाने आत जाऊन बसे. नंतर मात्र ती आम्हाला मस्त चकवायला लागली. तिला पकडण्यात, तिच्यामागे धावण्यात धमाल यायची. तिच्या आवडीचं काही तरी पिंजऱ्यात ठेवलं की मगच ती आपणहून पिंजऱ्यात जाऊन बसे. तिच्या शेपटीवर आता सुंदर असा एक काळा-पांढरा बँड दिसायला लागला होता. आता तिला बाहेर सोडून बघायला हवं, हा पिंजरा तिचं खरं घर नाही, हे सारखं मनात यायचं. पण घरामागच्या दाट झाडीत कावळे, गरूड, घारी, वटवाघुळं खूप होती. नवीन बुजणारा पक्षी दिसला की त्यांचं काम फत्तेच मग ! मला कल्पनेनेच भीती वाटायची.

आमच्या मागच्या अंगणात छोटंसं लॉन होतं. चहुबाजूंनी कुंपणावर दाट वेली चढलेल्या होत्या. त्याला लागून काही झाडं होती आणि मागे काही घरं होती. त्यामुळे ही जागा तशी सुरक्षित होती. कोणा ना कोणाचं लक्ष असायचं. मग एके दिवशी तिला सोडलं बाहेर सकाळी सकाळी… तिच्या उडण्याकडे आम्ही लक्ष ठेवून होतोच. ती आता भुर्रकन उडून जाणार आणि मग परत येणारच नाही असं वाटत होतं; मात्र लगेच तसं काही झालं नाही. ब्राउनी आसपास सगळीकडे उडून अंदाज घेत होती. दोन-तीन तास ती बाहेर उडत होती. हा नवीन पक्षी आलाय हे बाकीच्या बुलबुल पक्ष्यांना लक्षात आलं असावं. तिथे नेहमी नियमित उडणारे बुलबुल, सनबर्ड तिला पळवून लावत होते. मध्येच ती भेदरून आमच्या खांद्यावर येऊन बसे. काही वेळाने ती त्या वातावरणातही स्थिरावली.

दुपार व्हायला लागल्यावर ती आमच्या स्वयंपाकघराच्या जाळीच्या दारावर येऊन उड्या मारायला लागली. तिला आत यायचं होतं. तशीच ती दारावर घुटमळत राहिली. परत काही वेळ बाहेर बागडून मग सरळ आत आली. मला जरा धक्काच बसला. तिला आता या घराची आणि माणसांची सवय झाली होती. ती परतल्याचा आनंद तर होता; पण पक्ष्याने कसे मस्त पंख पसरायला हवेत, बाहेर झाडांवर उडायला हवं ! ब्राउनीने तसं केलंच नाही तर…?

हिची बाहेरच्या जगाशी ओळख करून द्यायची असेल तर तिला रोज बाहेर सोडायला हवं हे लक्षात आलं. मग आम्ही तिला रोज सकाळी मागच्या अंगणात सोडून द्यायचो. हळूहळू मागच्या अंगणाची तिला सवय झाली. तिला हुसकावणाऱ्या पक्ष्यांचंही ती त्या अंगणात ऐकेनाशी झाली. तरीही तिच्या उडण्यावर आमच्यापैकी कोणाचं तरी लक्ष असायचंच.

तिचं रोज तिथे असणं, उडणं बहुधा कावळ्यांनी हेरलं असावं. एकदा ती जराशी बेसावध असताना एका कावळ्याने तिचा पंख पकडून तिला पकडून न्यायचा प्रयत्न केला. सुदैवाने आमचे एक शिपाईकाका तिथून चालले होते. त्यांचं तिकडे लक्ष गेलं आणि कावळ्याला हटकून त्यांनी तिला सोडवलं. तिच्या पंखाला थोडीशी इजा झाली होती पण जास्त काही लागलं नव्हतं.

रोज सकाळी तिला बाहेर सोडलं की आम्ही तिचा पिंजरा तिथेच अंगणात दार उघडून ठेवायचो. हळूहळू ती बाहेर तिचं अन्न मिळवायला शिकत होती. किडे मुंगी खाताना ती दिसायची, पण म्हणावं तसं पोटभर अन्न मिळवायला अजून ती शिकली नव्हती. आता धाडस करून मागच्या अंगणातल्या मोठ्या झाडांवर ती उडत जायला लागली, बंगल्याच्या मागच्या कुंपणापर्यंतही छान उडायला लागली; पण संध्याकाळी मात्र ठरलेल्या वेळेला ती पिंजऱ्याच्या अवतीभवती घोटाळत राहायची. मग तिला आम्ही आत घेऊन यायचो.

हे सगळं चार-पाच महिने चाललं, आणि एक दिवस माझ्या लहान मुलीने मला येऊन सांगितलं, “आई, ब्राउनीला फ्रेंड मिळालाय. कोणाबरोबर तरी उडतेय ती.” माणसाळलेल्या पक्ष्याशी इतर पक्ष्यांनी मैत्री करावी याचं मला खूप आश्चर्य वाटलं; पण त्यामुळे आम्हाला सर्वांनाच खूप आनंदही झाला.

तरी त्यानंतरही काही दिवस ब्राउनी नेमाने संध्याकाळी घरी येत राहिली. नंतर तिच्या येण्याला काही दिवस उशीर झाला. पण अजूनही ती कधीच रात्रीची घराबाहेर राहिली नव्हती. दोन-तीनदा तिला हाका मारून, शोधून आम्ही घरी घेऊन आलो. तिला हाका मारल्या आणि तिच्या ओळखीची शिट्टी वाजवली तर ती खांद्यावर येऊन बसायची.

….पण एक दिवस ती संध्याकाळी घरी आलीच नाही. तेव्हाच मला लक्षात आलं, की आता तिचा आपल्या घरातला मुक्काम संपला. नंतरचे काही दिवस जोडीने ती घराच्या आजूबाजूला उडताना दिसली. आणि कायमची बाहेरच रुळून गेली.

ती आज आमच्याबरोबर नाही याचं वाईट वाटतंच; पण तिला कायम पिंजऱ्यात बंद करून ठेवणं आम्हालाही आवडलं नसतंच. आता घराभोवती कुठेही बुलबुल दिसले की आम्ही त्यात ब्राउनीला शोधायचा प्रयत्न करतो. मागच्या अंगणातला तिचा पिंजरा ती उडून गेल्यापासून तसाच आहे. त्या पिंजऱ्यामुळेही आम्हाला तिची खूप आठवण येते. आता तिने जोडीदारासमवेत घरटं बांधलं असेल. मग ती अंडी घालेल. नंतर तिच्यासारख्याच इटुकल्या पिटुकल्या पिल्लांना सांभाळेल… आम्ही विचार करत बसतो. ते घरटंही कदाचित असंच आमच्या आसपास कुठल्या तरी झाडावर असेल. तेव्हा ती आम्हाला आणि आम्ही तिला ओळखू का? माहिती नाही. मात्र, तेव्हा आम्ही तिला हाक मारून, ओळखीची शिट्टी वाजवून परत बोलावण्याचा प्रयत्न नक्की करणार नाही. तिने झाडांवर, जंगलात मस्तपैकी राहावं यासाठीच तर आम्ही तिला सांभाळलं होतं.

Leave a Comment