Story of flute player in Marathi :  बासरीवाला गोष्ट

By AllinFocus

Published on:

Story of flute player in Marathi :  बासरीवाला गोष्ट

एका गावात उंदीर फार झाले होते. घरात उंदीर, गल्लीत उंदीर, शेतात उंदीर, जिथे बघावे तिथे उंदीरच उंदीर ! उंदीर फार नुकसान करत होते. गावातील लोक या उंदरांमुळे अगदी त्रासून गेले होते. पण उंदरांचा बंदोबस्त कसा करावा, हेच त्यांना सुचत नव्हते.

एके दिवशी एक बासरीवाला फिरता फिरता त्या गावात येऊन पोचला. तो निरनिराळ्या सुरांत अतिशय सुरेल बासरी वाजवून माणसांवर किंवा पशुपक्ष्यांवर मोहिनी घालू शकत होता. त्याला गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचे कारण समजले, तो गावातील लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला उंदरांच्या त्रासातून सोडवीन. पण तुम्हांला त्यासाठी मला पाच हजार रुपये द्यावे लागतील.” गावकऱ्यांनी त्याची अट मान्य केली.

बासरीवाला बासरी वाजवत वाजवत गल्लीबोळांतून फिरू लागला. त्याच्या बासरीच्या सुरांनी घराघरातील कोपऱ्याकोपऱ्यातून सर्व उंदीर धावत बाहेर आले. शेतांतून, गल्लीबोळांतून आणि इतर सर्व ठिकाणांहून उंदीर धावतपळत बासरीवाल्याजवळ आले. बासरीवाला बासरी वाजवत वाजवत नदीच्या दिशेने जाऊ लागला. उंदीरसुद्धा उड्या मारत त्याच्यामागे मागे जाऊ लागले. अखेर बासरीवाला नदीच्या पाण्यात उतरला. त्याच्यामागोमाग सर्व उंदरांनीसुद्धा नदीमध्ये उड्या मारल्या आणि सर्व उंदीर पाण्यात बुडून मरण पावले.

गावातील लोक उंदरांच्या त्रासातून सुटले. बासरीवाला गावात परतला. त्याने गावकऱ्यांकडे पाच हजार रुपये मागितले. पण गावकऱ्यांनी त्याला पाचशे रुपयेच दिले. बासरीवाल्याने ते पैसे घेतले नाहीत. ठरल्याप्रमाणे बासरीवाल्याने पाच हजार रुपयांचा आग्रह धरला. पण गावकऱ्यांनी पाच हजार रुपये देण्यास नकार दिला.

बासरीवाल्याने गावकऱ्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला.

बासरीवाल्याने पुन्हा आपली बासरी वाजवायला सुरवात केली. तो गल्लीबोळांतून फिरू लागला. मुलांशिवाय इतर सर्व माणसांवर त्या सुरांची जादू . झाली. सर्व लोक जिथे होते तिथेच गाढ झोपी गेले आणि घोरू लागले. मग बासरीवाल्याने आपल्या बासरीचे सूर बदलले. या सुरांनी आता गावातली मुले नाचत, उड्या मारत बासरीवाल्याच्या मागे मागे चालू लागली.

also read: Union Budget 2024 Expectations

बासरीवाला गाव सोडून जंगलाच्या दिशेने गेला. तिथे डोंगरात एक गुहा होती. बासरीवाला गुहेजवळ येऊन पोचला. एकाएकी गुहेचा दरवाजा उघडला गेला. बासरीवाल्याने गुहेच्या आत प्रवेश केला. मुलेसुद्धा त्याच्या मागे मागे गुहेमध्ये गेली. नंतर गुहेचे दार बंद झाले.

गुहा आतमध्ये खूप लांबलचक होती. बासरीवाला आणि मुले गुहेमध्ये बराच वेळ चालत होती. शेवटी ते सारे एका महालाजवळ येऊन पोचले. महालाच्या भोवताली एक मोठी बाग होती. त्या बागेत सुंदर झाडेझुडपे, फुलेफळे आणि हिरवेगार गवत होते. तसेच त्या बागेत झोके, घसरगुंड्या इत्यादी खेळण्याची साधने देखील होती. हे सर्व पाहून मुले फार खुश झाली. ती बागेत खेळू लागली. त्या महालात राजा-राणी राहत होते. इतक्या सर्व मुलांना पाहून ती सुद्धा फार खुश झाली. राजा-राणीने मुलांना खाऊ-पिऊ घातले आणि प्रेमाने त्यांचा सांभाळ करू लागली.

एक आठवडा उलटला. गावातील लोक हळूहळू झोपेतून जागे झाले. त्यांना त्यांची मुले आजूबाजूला दिसेनात. त्यांना रडू कोसळले. मुलांशिवाय गाव ओसाड वाटू लागले. गावकरी आता बासरीवाल्याचा आणि मुलांचा शोध घेऊ लागले. परंतु त्यांना मुलांचा ठावठिकाणा लागला नाही. आता त्यांना फार पश्चात्ताप झाला. ते मुलांचा शोध घेत फिरत फिरत दूर एका तलावाच्या काठी पोचले. तिथे एक परी पाण्यातून बाहेर आली. तिने गावकऱ्यांना सांगितले –

“तुम्ही लोकांनी बासरीवाल्याचा अपमान केला आहे. बासरीवाला चांगला माणूस आहे. तुमची मुलं त्याच्याकडे सुरक्षित आहेत. तुम्हांला जर तुमच्या मुलांना परत मिळवायचे असेल, तर डोंगरातील गुहेजवळ जा आणि गुहेवर लिहा – ‘आमच्याकडून चूक झाली आहे. आम्हांला माफ कर’.”

सर्व गावकरी डोंगरातील गुहेजवळ गेले. त्यांनी परीच्या सांगण्यानुसार गुहेवर लिहिले : ‘आमच्याकडून चूक झाली आहे. आम्हांला माफ कर.’ लगेचच गुहेचा दरवाजा उघडला गेला. सर्व गावकरी गुहेच्या आत चालत गेले. ते बराच वेळ चालत राहिले आणि शेवटी एका महालाजवळ आले. महाल आणि सुंदर बाग पाहून ते आश्चर्यचकित झाले. बागेत बासरीवाला बासरी वाजवत होता आणि मुले खेळत होती. मुलांना मजेत खेळताना पाहून गावकऱ्यांना आनंद झाला. त्यांनी बासरीवाल्याचे पाय पकडून त्याची क्षमा मागितली आणि त्याचे पाच हजार रुपये चुकते केले. मुलेसुद्धा आपापल्या आईवडलांना पाहून खुश झाली. राजा-राणीने सर्वांचा प्रेमाने निरोप घेतला.

बासरीवाल्याने गावकऱ्यांना त्यांचे पाच हजार रुपये परत दिले आणि म्हणाला, “हे पैसे घेऊन जा. हे पैसे आपल्या मुलांवर खर्च करा. पण यापुढे मात्र नेहमी इमानदारीने वागा.”

Leave a Comment